Ad will apear here
Next
गणेशमूर्तींचा अमोल संग्रह
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख (ता. संगमेश्वर) येथे गणेशमूर्तींचे अनोखे संग्रहालय आहे. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील तब्बल दोनशे गणेशमूर्ती तेथे पाहायला मिळतात. गणेशमूर्तींचे हे अनोखे संग्रहालय कलेची दृष्टी असलेल्या एका महिलेच्या कलासंग्राहक वृत्तीचे प्रतीकही आहे. त्या संग्रहालयाविषयी...
.........
वसंत मनोहर उर्फ बाळासाहेब पित्रे आणि देवरूख हे समीकरणच गेल्या पावशतकात निर्माण झाले आहे. सत्तावीस वर्षांपूर्वी त्यांनी छोट्याशा जागेत अवघ्या ५०० चौरस फूट जागेत सुश्रुत सर्जिकल्स कारखाना सुरू केला. कालांतराने अॅडलर नावाची आणखी एक कंपनी सुरू झाली. आता भव्य इमारतीतून चालणाऱ्या या कंपन्यांमध्ये शरीरातील हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी वापरले प्रत्येक इन्स्ट्रुमेंट तयार केले जाते. या उत्पादनाला जगभरात मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून कच्चा माल आयात करून या साधनांचे उत्पादन केले जाते. दोन्ही कंपन्यांना उत्पादनांसाठी आयएसओ प्रमाणपत्रे आहेत. या कारखान्यांमुळे तीनशेहून अधिक कुटुंबांना रोजगार मिळाला आहे; मात्र ही केवळ उद्योगाची एकच बाजू झाली. तेथील कामगार-कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीची सोय झाली असली, तरी सांस्कृतिक आणि कला क्षेत्राची मोठी भूक या उद्योगाच्या पाठबळावर सुरू झालेल्या पित्रे ट्रस्ट आणि अन्य संस्थांनी भागविली आहे. मोठे सामाजिक कार्यही या संस्थांनी केले आहे.

‘क्रेडार’ या संस्थेच्या स्थापनेतून डी-कॅड (देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले महाविद्यालय सुरू झाले. या महाविद्यालयात चित्रकला, हस्तकला, पेपर क्राफ्ट, पेपर मॅश, स्क्रीन प्रिंटिंगसह कलाविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात. हस्तकलेतून साकारलेल्या वस्तूंची विक्रीही तेथे होते. देवरूखमधील नाट्यगृहाची कमतरता लक्षात घेऊन बाळासाहेब पित्रे प्रायोगिक कलामंच स्थापन करण्यात आला. तेथे संगीत, सांस्कृतिक महोत्सव, व्यावसायिक नाट्यप्रयोग होतात. पित्रे फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यही केले जाते. चारशे शाळांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. परिसर विकास प्रकल्प राबवून प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोजगाराचे दिशादर्शनही करण्यात आले आहे. बेंगळुरू येथील विवेकानंद योग संशोधन संस्थेशी संलग्न असलेले बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र रत्नागिरीत राष्ट्रीय सेवा समितीतर्फे चालविले जाते. या केंद्राची शाखा आता देवरूखमध्येही सुरू होत आहे. 


देवरूख शहरात डी कॅड संस्थेने सुरू केलेल्या उषाताई नातू गणेश संग्रहालयात देशविदेशांतील दोनशेहून अधिक गणेशमूर्ती एकत्रित ठेवण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या गणेशोत्सवातही भाविकांना या मूर्ती पाहण्यासाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. कलेची सामाजिक दृष्टी असलेल्या बाळासाहेबांनी कलेचे आणि कलाकारांचीही अनेक रोपे लावली आहेत, असेच म्हणता येईल. उषाताई नातू गणेशमूर्ती संग्रहालय हेसुद्धा बाळासाहेबांच्या कलात्मक दृष्टीचेच एक अपत्य आहे.

बाळासाहेबांच्या विहीणबाई म्हणजेच त्यांच्या सूनबाई भारती अजय पित्रे यांच्या मातोश्री उषा माधव नातू यांनाही कलेची दृष्टी उपजतच लाभली होती. भारती पित्रे यांच्याशी बोलताना त्याचे अनेक दाखले मिळतात. अगदी स्वयंपाक करायचा झाला, तरी तो व्यवस्थित असला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. प्रत्येकच बाबीकडे त्या वेगळेपणाने पाहत असत. गणेशमूर्तींच्या संग्रहाची सुरुवात त्यांच्या या वेगळेपणाने पाहण्यातूनच झाली. त्या मुंबईला राहत. देशात विविध ठिकाणी आणि विविध देशांमध्ये प्रवास करताना तेथील गणेशांची रूपे त्यांनी संग्रहित केली. त्यांच्याच नात्यातील डॉ. वझे यांच्या एका पुस्तकातून त्यांनी त्या मूर्तींचे संदर्भ लावले. विश्वकोशाच्या आधारे ठिकठिकाणच्या मूर्तींची माहिती संकलित केली. काही मूर्ती त्यांनी वर्णनानुसार खास कलाकारांकडून तयार करवून घेतल्या. त्यांचा हा छंद त्यांनी कित्येक वर्षांपासून जोपासला होता. अगदी १९६० सालापासूनच्या मूर्ती त्यांनी संग्रहित केल्या होत्या. उभा, आडवा, बसलेला, नृत्य करणारा अशा विविध पोझेसमधील मूर्ती त्यात आहेत. माती, चिनी माती, लाकूड, पोवळे, विविध रत्ने, तसेच धातूच्या मूर्तींचाही त्यात समावेश आहे. काही मूर्तींच्या तपशिलावरून नजर फिरविली, तरी त्यातील वैविध्य लक्षात येईल. त्यांच्या संग्रहातील सर्वांत जुनी मातीच्या चौकटीची मूर्ती १९६० साली त्यांनी मिळविली. सर्वांत अलीकडच्या मूर्ती १९९४ सालच्या गोमेद आणि पुष्कराज रत्नामध्ये बनविलेल्या आहेत. कोयरीच्या आकाराचा गणपती त्यांनी मुंबईच्या चोरबाजारातून मिळविला आहे. संग्रहालयात दीड इंचापासून ते चार फुटांपर्यंतच्या मूर्तींचा समावेश आहे. चौदा विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्त्या गणेशाची महती केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात आहे. जगभरात गणरायाचे भक्त आणि त्याची स्थाने आढळतात. विघ्नहर्त्या गणरायाच्या कीर्तीचा महिमा अगाध आहे. त्याचे दर्शन ठिकठिकाणच्या मूर्तींच्या आकारातून प्रकट होते.


संग्रहातील काही मूर्तींचे वर्णन, त्या जेथे उपलब्ध झाल्या ते ठिकाण आणि त्या संग्रहात समविष्ट झाल्याचे वर्ष असे : स्फटिक (१९९३), चंद्रमणी (१९७६), फिरोजा (१९८६), गनस्टोन, श्रीनगर (१९८६), पन्ना एमेराल्ड, बेंगळुरू  (१९८१), पोवळे (१९८८), अलेक्झांडर, त्रिवेंद्रम (१९७४), माणिक, दिल्ली (१९७६), टायगर स्टोन (१९९१), कॅट्स आयस्टोन (१९९१), नीलमणी, त्रिवेंद्रम (१९८४), हिरवे मीनावर्क डिझाइन देऊन तयार करून घेतलेला गणपती (१९८५), चांदीच्या अंगठीतील गणपती (१९८७), १४ कॅरेट सोन्याचा उजव्या सोंडेचा गणपती (१९९४), दशावतारी, दार्जिलिंग (१९८९), तुळशी वृंदावन, फुलदाणी (आर्टिस्ट आजगावकर यांनी केलेले) (१९७५, १९७६), फुलदाणी, पठाणकोट (१९८८), काळा उभ्या दगडाचा मोठा गणपती, हैदराबाद (१९७८), टेराकोटा (१९८५, १९९१), बेंगळुरूजवळ स्वतः चितारलेला गणपती (१९८९), उंदरावर उभा अष्टभुज, त्रिवेंद्रम (१९८४), अख्ख्या हस्तिदंतातून कोरलेली गणेश-लक्ष्मी, चंदनातील उभा, म्हैसूर (१९७२), चारही दिशांना तोंड असलेला छत्रीधारी, महाबळेश्वर (१९७४), तीन ताम्रपट (१९७४), काचेचा सुवर्णवर्ख अलंकारयुक्त (१९७९), संगमरवरी, आग्रा (१९८१), ग्रीन स्टोन, दिल्ली (१९८१), मंदारवृक्षाच्या मुळाचा (१९९१), सुपारीवर कोरलेला, गोवा (१९८९), दगडी डबी, हैदराबाद (१९७०), साबण्या (सोप स्टोन), दिल्ली (१९७६), पोपटी दगड, हैदराबाद (१९७४), पितळी, तिरुपती (१९७८), नाच करणारा, श्रीनगर (१९७७), सोंडेने लाडू घेणारा उभा, चंडीगड (१९७६), देवीसह उभा राहून नृत्य करणारा, काश्मीर (१९७५), तारेचा उभा, बडोदा (१९८४), अष्टविनायक (१९८५), काचेचा उभा, पुणे (१९९०), उभा, गीता वाचणारा (१९८५), गौरीसह बारा हातवाला, महाबळेश्वर (१९८१), उभा, तारेचा, अहमदाबाद (१९७९),  बासरीवादक, डफवादक (१९८२), गणपतीपुळे (१९८९), तांब्याचा, नाशिक (१९८७), पितळेचा बसलेला (१९८५), टिटवाळा (१९८८), पंचागुळ डबी, गोवा (१९९१), तांब्याचा पाय पसरून रुसून बसलेला, महाबळेश्वर (१९८४), शेषशायी पंचधातू, दिल्ली (१९७४), नागावर बसलेला, बेळगाव (१९७३), फायबर ग्लास (आर्टिस्ट वाघ यांच्याकडून करून घेतलेला) (१९८०), वीणावादक (१९९४), कालियामर्दन (१९८५), दुतोंडी (१९८६), नेपाळी नाचाच्या वेशात (१९८२), जस्ताचा (१९८१), एकाच पायावर नाचणारा, म्हैसूर (१९७६), चंदनाचा पेन्सिल होल्डर, म्हैसूर (१९७६), मडक्यावरील (ओल्ड सिरॅमिक) (१९९०), अॅल्युमिनियम फॉइल (भारती पित्रे) (१९८५), पितळेचा, नेपाळ, पंचधातू पोकळ मॉडर्न आर्ट, उदयपूर (१९८९). 

याशिवाय भरतनाट्यममुद्रा, वाजंत्रीवाला, तीन तोंडाचा, लाकडी अलंकारयुक्त दगडावरील कोरीव अशा विविध स्वरूपातील गणपती संग्रहालयात आहेत. याशिवाय चीन, जपान, इंडोनेशिया, मलेशिया, कंबोडिया, आफ्रिका, श्रीलंका, भूतान, सुदान आणि इतर ठिकाणच्या देखण्या मूर्तीही दिवंगत नातू यांच्या या संग्रहात आहेत. त्यांनी अनेक मूर्ती त्यांच्या हितचिंतकांना भेटीदाखलही दिल्या आहेत. त्या दिल्या नसत्या, तर हा संग्रह कितीतरी मोठा झाला असता. आपल्या पश्चात या मूर्ती सांभाळल्या जाव्यात, यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेला गणेशमूर्तींचा संग्रह ‘डी-कॅड’ची मातृसंस्था ‘क्रेडार’ला भेट म्हणून दिला. त्यातूनच ‘डी-कॅड’ने उषाताई नातू यांच्या नावाने चार वर्षांपूर्वी मूर्तींचे संग्रहालय सुरू केले आहे. देवरूख येथील हे संग्रहालय गणेशभक्तांनी आणि कलाप्रेमींनीही जरूर पाहावे असेच आहे. 

- प्रमोद कोनकर
ई-मेल : pramodkonkar@yahoo.com
.............
साप्ताहिक कोकण मीडिया
हा लेख रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘साप्ताहिक कोकण मीडिया’च्या २५ ऑगस्टच्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. कोकणातील वैविध्यपूर्ण विषयांवरील लेख आणि वार्तांकन या साप्ताहिकात प्रसिद्ध केले जाते. ‘साप्ताहिक कोकण मीडिया’मधील निवडक लेख ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचण्यासाठी उपलब्ध होतील. 
वर्गणीसाठी संपर्क : 
प्रमोद कोनकर (संपादक, साप्ताहिक कोकण मीडिया)
मोबाइल : ९८२२२ ५५६२१, ९४२२३ ८२६२१
वेबसाइट : http://kokanmedia.webs.com/
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZYSBG
Similar Posts
श्री गणपती नामावली गीत : सादरकर्ते - मझहर सिद्दिकी (व्हिडिओ) काश्मिरी युवा गायक आणि संगीतकार मझहर सिद्दिकी यांनी गीताच्या स्वरूपात सादर केलेली श्री गणेश नामावली
असा घडतो गणपतीबाप्पा (व्हिडिओ) उद्या घरोघरी गणपतीबाप्पांचं आगमन होत आहे. पर्यावरणपूरक गणपती वापरण्याचा ट्रेंड अलीकडे शहरांत फारच वाढीला लागला आहे. तो नक्कीच चांगला असला, तरी कोकणातल्या बहुतांश भागांत फार पूर्वीपासूनच शाडूच्या मातीपासून किंवा नदीच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवल्या जातात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो
श्री गणेशाची वैविध्यपूर्ण रूपे १४ विद्या आणि ६४ कलांची अधिष्ठात्री देवता असलेल्या श्रीगणेशाच्या विविध रूपांचा पट चित्रकार सचिन माधव जोशी यांनी चित्रांच्या माध्यमातून मांडला आहे. गणपतीची विविध रूपे दर्शविणाऱ्या त्यांनी काढलेल्या चित्रांच्या ‘देवा तुचि गणेशु’ या प्रदर्शनाची झलक आणि त्यांची मुलाखत पाहा सोबतच्या व्हिडिओत...
तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरातील आश्चर्यकारक आणि अविश्वसनीय स्थापत्यशास्त्र! तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील १००० वर्षांपूर्वी, चोला राजवटीत, साधारण २०-२५ वर्षांत बांधून पूर्ण केलेले बृहदीश्वर मंदिर हा भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अचंबित करणारा नमुना आहे!

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language